महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या नेतृत्वाने काँग्रेस अंतर्गत शेतकरी संघ स्थापन केला होता. परंतु काँग्रेस नेतृत्वाने काँग्रेस अंतर्गत अशी संघटना चालविता येणार नाही, म्हणून नोटीस दिली. त्यामुळे ३ ऑगस्ट १९४८ रोजी आळंदी येथे एक मेळावा दे. भ. शंकरराव मोरे, दे. भ. केशवराव जेधे, क्रांतिसिंह नाना पाटील, भाऊसाहेब राऊत, आदी नेत्यांनी आयोजित केला होता.
    नव्या पिढीतील जी. डी. बापू आणि त्यांचे प्रतिसरकार मधील साथीदार या मेळाव्यास हजर होते. त्यावेळी काँग्रेस सोडून हे सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत सहभागी झाले. बापूंची शेतकरी, कामगार, कष्टकरी, रोजमजूर, आदींशी असलेली निष्ठा बलशाली असल्याने शेतकरी कामगार पक्षाची त्यांनी स्थापना केली. शेतकरी कामगार पक्षाने स्थापनेपासूनच शेतीमालाचा बाजारभाव, अन्न टंचाई, शेती मालाची लेव्ही आदी प्रश्नांवर शेतकऱ्यांचे मोर्चे संघटित व आयोजित केले.
    जी. डी. बापूंनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी व मराठवाडा मुक्ती लढ्यासाठी शस्त्रास्त्रे गोळा केली होती. हत्यारांची जमवाजमव करून सरकार विरुद्ध कट केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. कराड येथे केशवराव पवार यांच्या घरी शे.का. पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक सुरू असताना पोलीस त्यांना अटक करण्यासाठी आले. त्यावेळी बापू तेथून फरारी झाले. परंतु लवकरच शेदुरजणे फाट्यावर प्रवासी वाहतूक गाडीची वाट पहात उभे असताना हत्याबंद पोलिसांनी पकडण्यासाठी बापू व महादेव मिरगे यांना गराडा घातला.
    त्या अवस्थेतही बापू पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटून जाऊ शकत होते. परंतु, लोकांची मानसिकता संघर्ष करण्याची राहिली नाही, हे जाणून 'आपण आत्तापर्यंत केलेल्या कृतीचं मूल्यमापन करायला पाहिजे. आपण काय केलं, पुढे काय करायला पाहिजे, याचा विचार करायला संधी मिळावी' म्हणून बापूंनी अटक करून घेण्याचा निर्णय घेतला आणि बापूंना साखळदंडानी जखडून अटक झाली. इंग्रजी सत्तेच्या पोलिसांना भूमिगत असताना कधीही न सापडलेल्या बापूंना स्वातंत्र्यातील पोलिसांनी अटक करण्याचा पराक्रम केला.