कुंडलच्या पश्चिमेस सह्याद्रीचा पूर्व-पश्चिम अशा एक डोंगराचा फाटा आहे. तो फाटा कुंडलगावाजवळ गोलाकार म्हणजेच कुंडलाकार आहे. डोंगराच्या दक्षिण बाजूस गोलाकार डोंगराचा फाटा आहे तिथे जैनधर्मीयांचे तीर्थक्षेत्र झरी पार्श्वनाथ आहे तसेच या डोंगराच्या नैऋत्य बाजूस वीरभद्र देवस्थान आहे. एकूण या गोलाकार डोंगराच्या कुशीत वसलेले म्हणून हे कुंडल. चारी दिशांना असलेल्या चार गणेशांची कृपाछायेत विसावलेले कुंडल गाव हे अडीच तीन हजार वर्षापूर्वी कुंडल हे एक सर्वांगिण प्रगती झालेले श्रेष्ठतम असे नगर होते. इ.सन. 500 ते 1200 पर्यंत या नगराला राष्ट्राचा दर्जा प्राप्त होता. ते कुंतल राष्ट्र म्हणून ओळखळे जात होते. या राष्ट्रावर चालुक्य, राष्ट्रकूट, कदंबांची घराणी राज्य करत होती. हा प्रदेश सुसंस्कृत, वैभवशाली असाच होता. सत्येश्वर राजाची पाढरी अशी या गावाची प्राचीन ओळख सांगितली जाते. कुंडल हे कुंतल राष्ट्राच्या राजधानीचे गाव होते. आजही सह्याद्रीच्या पायथ्याला राजवाडा म्हणून संबोधले जाते. इस्लामी आक्रमणे या भागावरही झाली. त्यातूनही पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा भाग बनण्याचे भाग्य या प्रदेशाला लाभले. पेशवाईमध्ये मात्र पेशवाईचा 1818 साली अंत झाल्यानंतर ब्रिटिश राजवटीमधील अनेक संस्थानापैकी एका संस्थानातील गाव. औंध संस्थानचा हा एक तालुक्याचा गाव होता.
    सत्येश्वर राजाची पांढरी ही "कुंडल'ची प्राचिन ओळख! वीरभद्र व पार्शवनाथ ही दोन अनुक्रमे लिंगायत आणि जैन धार्मिक स्थळे असणाऱ्या सह्याद्रीच्या पायथ्याला वसलेले कुंडल हे औंध संस्थानच्या तालुक्याचा गाव होते! औंधचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी हे स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी देशी उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले होते. म्हणूनच त्यांनी कुंडलचा माळरान बेळगाव येथे छोटामोठा उद्योग करणाऱ्या लक्ष्मणराव किर्लोस्करांना उद्योग उभारण्यासाठी दिला. उद्योगरत्न लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि शंतुनराव किर्लोस्करांच्या किर्लोस्करवाडीच्या कारखान्यामुळे औद्योगिकरणाची देशभर ओळख झालेला गाव ही कुंडलगावची उद्योगी गाव म्हणून ओळख! औंध संस्थानचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी आणि त्यांचे सुपुत्र आप्पासाहेब पंतप्रतिनिधी ह्यांच्या राष्ट्रीय मनोवृत्तीने स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भारावलेल्या अनेक क्रांतिकराकांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेला क्रांतिकारक गाव! 1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनात पारतंत्र्यातही त्यावेळच्या सातारा जिल्ह्यातील 600-700 खेड्यातील जनतेला स्वातंत्र्यातील सुराज्याची ओळख करून देणाऱ्या प्रतिसरकारच्या राजधानीचा गाव! धगधगत्या आणि स्वातंत्र्यासाठी समर्पित भावनेने इंग्रजी साम्राज्याशाही सत्तेशी दोन हात करणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने भारताला गुलामगिरीत लोटणाऱ्या इंग्रजांना सहाय्य करणाऱ्या इंग्रज धार्जिण्यांना जरब बसवणाऱ्या शूरवीरांचा गाव!
    ज्याप्रमाणे भारताच्या प्राचीन इतहासात कुंडलला महत्त्वाचे स्थान आहे तसेच भारतीय स्वातंत्र्यासाठी जो स्वातंत्र्यसंग्राम झाला त्या आधुनिक इतिहासात देखील कुंडलच्या शेकडो सुपुत्रांनी आणि माताभगिनींनी प्रतिसरकारची स्थापना करून ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला विरोध करत अतुलनीय कामगीरी केली आहे. प्रतिसरकारचे प्रेरक क्रांतिसिंह नाना पाटील यांची जन्मभूमि जरी येडेमच्छिंद्र होती तरी त्यांची कर्मभूमी कुंडल होती. कुंडलच्या स्वातंत्र्य आंदोलनातील या देदीप्यमान कामगिरीमुळेच महाराष्ट्र शासनाने भारताच्या स्वातत्र्यासाठी शीर तळहातावर घेऊन लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांची स्मारके कुंडलच्या वैभवात भर टाकत आहेत.
    देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनातील प्रखर आणि जाज्ज्वल्य कामगिरीमुळे अनेक थोरामोठ्यांचा सहवास या गावाला लाभला. महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून ओळखळे जाणारे ग. दि. माडगूळकर इथल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे प्रेरणास्त्रोत होते. सशस्त्र स्वातंत्र्य आंदोलनातील पुढारी अच्युतराव पटवर्धन, साहित्यिक वामनराव चोरघडे, साने गुरुजी, यांच्या सारख्या अनेक महापुरुषांनी कुंडलच्या पुण्यप्रतापी भूमिला भेट दिली होती.
    तसा पूर्वी गावाचा शेती आणि विणकाम हा प्रमुख व्यवसाय असला तरी बाराबलुतेदार या गावात खेळीमेळीने राहत होते. गावच्या हद्दीत दक्षिणेला उद्योगमहर्षी लक्ष्मणराव किर्लोस्करांनी औंध संस्थानाधिपतींच्या मदतीने स्थापन केलेला किर्लोस्करवाडीच्या कारखान्यामुळे औद्योगिकरणाचा स्पर्श लाभला. आणि परंपरागत शेती आणि बाराबलुतेदारीचा उद्योग करणारे कुंडलचा माणूस कामगार झाला. गावाला स्थैर्य आलं. अगदी कृष्णाकाठी नाही पण जवळून संथपणे वाहणाऱ्या कृष्णा माईच्या पाण्याने सहकारी पाणीपुरवठा संस्थाच्या माध्यमातून गावची जमीन सुजलामसुफलाम झाली. पण त्यासाठी 1972 चा भयाण दुष्काळ झेलावा लागला.
    1972चा भिषण दुष्काळ पडला. माणसांचे अन् जनावरांचे पाण्याविना हाल हाल झाले. उभी पिकं करपून गेली. यातून गावातील व परिसरातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न संपविण्यासाठी सहकारी पाणी पुरवठा योजना सुरु झाल्या. त्यामुळे कुंडल आणि परिसरातील माळरानाचं नंदनवन झालं. द्राक्ष, ऊस आदी बागायती शेती झाली. भरघोष उत्पादन येऊ लागलं. कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या कष्टाचं चीज झालं. पण उत्पन्नाचं काय, म्हणून शेती मालावर प्रक्रिया उद्योग उभा राहिले पाहिजेत म्हणून क्रांती सहकारी साखर कारखान्याची उभारणी करण्यात आले. कुंडल आणि परिसरातील तरूणाना नोकऱ्या तर मिळाल्याच पण रोजगार वाढला. छोटे-मोठे व्यवसाय वाढले. लोकांची वर्दळ वाढली अन् सगळेच व्यवसाय चांगले चालू लागले. हाताला काम मागणाऱ्या प्रत्येकाला काम देण्याची क्षमता गावामध्ये निर्माण झाली. त्यामुळे श्रमाला प्रतिष्ठा देणारा गाव अशी गावाची आधुनिक ओळख झाली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी गरिबीतही प्राणाची बाजी पणाला लावणाऱ्या या गावात समृद्धी आली. एकेकाळी पिण्याच्या पाण्यासाठी रात्रंदिवस पायपीट करणारा गाव ऐश्वर्यसंपन्न आणि सुखी झाला. कुंडल तसे ग्रामीण भागातील मोठ्या लकवस्तीचे खेडेगाव असले तरी सर्वप्रकारच्या आधुनिक नागरी सोयीसुविधा नागरिकांना उपलब्ध होत आहेत.
    वंचितांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि शिक्षणाच्या सुविधेअभावी शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील विद्यार्थी वसतिगृह हे नावाजलेले वसतिगृह गेली 75 वर्षे दूरदूरच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्याप्रवाहात आणण्याचे कार्य करत आहे. गावात अनेक खाजगी शिक्षणसंस्था मराठी, सेमी इंग्रजी, इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करताहेत. गावामध्ये सर्व समाजामध्ये एकोपा वाढावा व निकोप वातावरण तयार व्हावे यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नगर आणि अण्णाभाऊ साठे नगर अशा दोन संमिश्र वसाहती स्थापन केल्या आहेत. एक गाव एक गणपती सारखा उपक्रम राबविण्यामध्ये गावाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. सर्वघर्मियांचे सण सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करण्यात येतात. गावाला शंभर वर्षाची मातीतील कुस्तीचे मैदान भरविण्याची परंपरा आहे. सांडपाण्याची व्यवस्था, दीवाबत्ती व्यवस्था, रस्त्यांची स्वच्छता, घनकचरऱ्याची विल्हेवाट, सांडपाण्याच्या शुद्धीकरणाचा प्रकल्प, आरोग्य व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आदी पायाभूत सुविधा गावच्या नागरिकांना दिल्या जातात. अशा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षम कारभारामुळे एवढी मोठी लोकसंख्या असणाऱ्या कुंडलला हगणदारीमुक्त गाव, तंटामुक्त गाव, स्वच्छ आणि सुंदर गावाचे पुरस्कार मिळाले आहेत. गावातील सर्व संस्थांच्या प्रतिनिधीची ग्रामसंसंद सुरू करुन गावाच्या विकासाचे निर्णय सामूहिकपणे घेतले जातात व ते ग्रामपंचायतीद्वारे राबविले जातात. कुंडलची आधुनिक इतिहासात स्वातंत्र्यसैनिकांचा गाव म्हणून जशी ओळख आहे तशी स्वच्छ, समृद्ध, निरोगी, विवेकी गाव म्हणूनही महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. या ओळखीसाठी ग्रामपंचायतीने केलेले सामुहीक प्रयत्न अतुलनीय असेच म्हणावे लागतील.
    कुंडलचे महाराष्ट्र कुस्ती मैदान, कुंडलची स्वातंत्र्य आंदोलनातील सैनिक प्रशिक्षण शाळा, कुंडल मधील नाना पाटील वसतिगृह, कुंडल मधील सूर्यनमस्कारासाठी औंधच्या राजांनी बांधलेले सूर्योपासना मंदिर, कुंडलची द्राक्ष आणि ऊस शेती, कुंडलचा विणकाम व्यवसाय, कुंडलची प्रबोधनाची परंपरा, कुंडलचा क्रांती सहकारी साखर कारखाना, अशा अनेक गोष्टीमुळे कुंडलला एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे.
    अगदी कृष्णाकाठी नाही पण जवळून संथपणे वाहणाऱ्या कृष्णा माईच्या पाण्याने भगीरथ प्रयत्नांनी पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून सुजलामसुफलाम झालेला कुंडल गाव आज तितकाच समृद्धही झाला आहे. थोर साहित्यिक राम गणेश गडकरी यांच्या कृष्णा काठी कुंडल आता पहिले उरले नाही, या कवितेने साहित्यात कुंडलचा वेगळा ठसा निर्माण केला होता, आणि लाखो लोकांच्या मनात कुंडल विषयी जिज्ञासा निर्माण केली. वास्तविक पाहता कवितेतील वर्णनांशी कुंडलचा अर्थाअर्थी काही संबंध नाही, पण कृष्णा काठी कुंडल आज पूर्वीसारखे उरले नाही. ते आता सुखी, समृद्ध, आनंदी, स्वच्छ, आरोग्यदायी, उद्योगी, विवेकी राजकारण करणारे सुसंस्कृत गाव झाले आहे. त्यामुळे कवि गोविंदाग्रजांच्या कृष्णा काठी कुंडल आता पहिले उरले नाही या ओळी तरी आज खऱ्या ठरल्या आहेत.