Responsive image
  आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा.       गटारी वाहत्या ठेऊन आपले कुटुंब आरोग्य संपन्न ठेवा.       विचार करा एकाचा, मार्ग कुटुंब कल्याणाचा.       वैयक्तीक शौचालयाचा वापर करावा.       पिण्याच्या पाण्याचा वापर योग्य करा.       नळ कनेक्शनला चावीचा वापर करावा.       प्लास्टिकचा वापर करू नये.



ग्रामपंचायत कुंडल ता. पलूस जि. सांगली


ऐतिहासिक आणि पौराणिक ठिकाणे



झरी व गिरी पार्श्वनाथ मंदिर

    कुंडलला महाराष्ट्रातील प्राचीन काळापासून ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले जैन धर्मातील महत्वाचे सिध्द अतिशय क्षेत्र आहे .जैन धर्मशास्त्रात या तीर्थक्षेत्राला सुमारे १६०० वर्षाची परंपरा आहे.

    कुंडल हे प्राचीन काळी कौडण्यपूर म्हणून परिचित होते.राजा सत्येश्वराची ही भूमी. सातव्या शतकातील चालुक्य राजापासून कुंडल प्राचीन इतिहासाशी संबंधित आहे. जैन तीर्थक्षेत्रापैकी कुंडल हे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. पार्श्वनाथ तीर्थंकर, भगवान वर्धमान महावीर तीर्थंकर यांनी कुंडल च्या गिरीपठारावर धर्मसभा घेतली होती. याच पठारावर अंतिम श्रूत ऐकवली. श्रीधर मुनी व अन्य मुनींचे या ठिकाणी महानिर्वाण झाले. त्यामुळे ते क्षेत्र सिंधुक्षेत्र मानले जाते.

    चालुक्य वंशातील राजा विजयादित्य याने शके ६२७ मध्ये कुंडल जिनालयास मोठे दान दिल्याचे सांगितले जाते. यामध्ये कुंडल गावातील मंदिर, झरी पार्श्वनाथ व गिरी पार्श्वनाथ या मंदिराचा समावेश आहे. कुंडल ग्रामपंचायतीजवळ दक्षिणाभिमुख पार्श्वनाथ जिनमंदिर आहे. या मंदिरात पद्मासन असलेली कृष्णवर्णीय वालुकामय वज्रलेप केलेली मूर्ती भव्य अशा चौथऱ्यावर स्थित आहे. बंदिस्त जिनमंदिरातील सभागृहात सन १९७८ च्या उत्खननात सापडलेली भगवान महावीर तीर्थंकरांची मूर्ती उत्तराभिमुख आहे. कलिंकुंड पार्श्वनाथ समोर संगमरवरी मानस्तंभ आहे. तो चतुर्मुख तीर्थंकर दर्शन घेण्याच्या दृष्टीने कायमचा प्रघात आहे.

    कुंडलच्या पश्चिमेस दोन किलोमीटर पहाडावर श्री झरी पार्श्वनाथ हे दुसरे मंदिर आहे. या मंदिराकडे जाण्यासाठी सुमारे ३०० पायऱ्या आहेत.पार्श्वनाथ मूर्तीच्या पश्चिमेस बारमाही वाहणारा झरा आहे. पूर्व बाजूस मंदिरातच चतुर्भुज पद्मावती देवीची मूर्ती आहे.पूर्वेस असणाऱ्या गुहेत श्रीराम, सीता, हनुमान यांच्या मूर्ती आहेत.हे मंदिर सिताजानकी मंदिर म्हणून ओळखले जाते.

    झरी पार्श्वनाथच्या पश्चिम दिशेने जाणाऱ्या वाटेने उत्तरेकडे चार किलोमीटर अंतरावर डोंगरावर गिरी पार्श्वनाथ मंदिर आहे. पूर्व बाजूस असलेल्या मंदिरात एक मीटर उंचीची कृष्णवर्णीय पद्मासन मूर्ती आहे. पश्चिमेस दीड किलोमीटर अंतरावर आचार्य श्रीधरमुनींच्या पादुका आहेत. गिरी पठारावरून कुंडल परिसरातील हिरवेगार निसर्गाचे दृश्य मन प्रसन्न करून जाते.

    जैन धर्मियांच्या मूर्तीना पंचामृत अभिषेक करण्याची प्रथा आहे. त्या हेतूने पाच पदार्थ, अष्टोपचार पूजेची आठ द्रव्ये तसेच उपयूक्त घट यासाठी कुंडल परिसरातील गावे दान दिली होती. पूजा द्रव्यामध्ये येणारे दूध दुधारी, दही- दह्यारी, ताक - ताकारी तूप- तुपारी, घट-कुंभारगाव पूजेचे साहित्य पलूस, देवराष्ट्रे आदि गावाहून येत. प्रतिवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी श्री पार्श्वनाथांचा पालखी सोहळा होत असतो. यानिमित्त अनेक धार्मिक पूजा व कार्यक्रम होत असतात. महाराष्ट्र, कर्नाटक आदि राज्यातून मोठ्या संख्येने जैन समाजातील भाविक येतात. हीच जैन समाजाची यात्रा असते.




वीरभद्र मंदिर

    वीरभद्र देवस्थान खूप प्राचीन आहे परंतु पुरेशी प्रगती न झालेले ठिकाण. कराड, इस्लामपूर, सांगली येथून सारख्याच अंतरावर असलेला उत्तम भारतीय संस्कृतीचा नमुना असलेला, आळसंद, विटा, तासगाव येथून ही या देवस्थानच्या उभे असलेल्या दगडी बुरुजांचे दर्शन होते. एखाद्या किल्लया प्रमाणे त्याचे बांधकाम असल्याने पर्यटकांना ही आकर्षित करतो. दंत कथेनुसार विरभद्र क्षेत्र म्हणजे शंकराच्या जटेतून उत्पन्न झालेल्या दैत्य गळ्यात मुंडक्यांची, हातात तलवार, धनुष्यबाण असे वर्णन आहे.

    कुंडलला हे देवस्थान गुमारे ९०० वर्षांपूर्वी झालेले आहे. इतिहासानुसार वाणी समाजाचे सत्त्याप्पा लुपणे यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन साक्षात विरभद्राने त्यांना दर्शन दिले आणि स्वयंभू देवस्थान निर्माण झाले. दोन शतका पूर्वी म्हणजे १८७० साली सत्त्याप्पा लुपणे यांचे वंशज बसाप्पा लुपणे यांनी २५,००० रुपये खर्चून डोंगरावर दोन मोठ्या कमानी व मंडप बांधला. ९०० वर्षांपासून देवस्थानचे सर्व अधिकार पंचारती, पालखीचा मान हा वंश परंपरेने लुपणे घराण्याकडे चालत आलेला आहे. पुजारचेचा मान जंगम लोकांना देण्यात आलेला आहे. पलसे यांना आहेरचा मान आहे, हडदरे, बिडवे यांना दिवटीचा मान आहे, धुपारतीचा मान जंगम यांचा आहे. दरवर्षीप्रमाणे वीरभद्र देवाची यात्रा कार्तिक वैद्य ३० ला असते ही यात्रा म्हणजे एकप्रकारचा लग्न सोहळाच असतो. ही माहिती ब्रिटिश सरकारने १८८४ साली प्रकाशित केलेल्या बॉम्बे गॅझेट या पुस्तकात सापडते. आजही देवाची पालखी लुपणे यांच्या घरातून निघून पुन्हा तिसऱ्या दिवशी रात्री मिरवणुकीने त्यांच्याच घरात विसर्जित होते.

    गावाच्या पश्चिमेस असलेला हा डोंगर सह्याद्री पर्वत रंगांच्यातील एक टोक आहे. या डोंगराला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. महाराष्ट्र, कर्नाटकातून अनेक भाविक दर्शनासाठी वर्षभर येत असतात कुंडल पावन भूमीतिल असंख्य आठवणी घेऊन जाताना वीरभद्र देवस्थानावरून कृतार्थ भावनेने पुन्हा येण्याच्याआशेने मार्गस्थ होतात.