प्रतिसरकारची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रव्यापी करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांनी सांगलवाडी येथे युवा नेतृत्व शिबिर आयोजित केले होते. या शिबिरासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागपूर पासून ते बेळगाव, गोव्याचे कार्यकर्ते ज्यांना जनतेच्या प्रतिसत्तेचा दृष्टिकोन, कार्यतंत्र मान्य होते, असे सर्वजण उपस्थित होते.
    या शिबिरासाठी उपस्थितांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्याने खर्चाची अडचण निर्माण झाली. त्यावेळी बापूंच्या सुविद्य पत्नी सौ. विजयाताई लाड यांनी आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या व शिबिर यशस्वीपणे पार पडले. परंतु, काही काळातच ब्रिटिश साम्राज्यसत्तेने भारताला स्वातंत्र्य देण्याचे जाहीर केले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रव्यापी प्रतिसत्ता स्थापन करण्याचा जी. डी. बापूंचा मनोदय अपूर्णच राहिला. या शिबिराचा फायदा पुढे शे. का. पक्षाची संघटना वाढविताना जी. डी. बापूंना झाला.
    भारताला स्वातंत्र्य देण्याच्या वाटाघाटी चालू झाल्या होत्या. ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष त्यामुळे थंडावला होता. जी. डी. बापू लाड आपले सहकारी महादेव मिरगे, गोविंद जोशी यांच्यासह गोव्याला गेले. गोव्यातील पोर्तुगीज सत्ता संपुष्टात आणण्यासाठी, तेथील आंदोलनाला बळ देण्याकरिता गोव्यातील सर्व भागांचा दौरा त्यांनी केला. विश्वनाथ लंवदे व त्यांच्या सहकाऱ्यांना गोवा मुक्ती लढ्यात साहाय्य करण्याचा निर्णय घेतला.
    जी. डी. बापू लाड यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने म्हापसा कचेरी बॉम्बने उडवून देण्याची योजना तयार केली. या योजनेप्रमाणे जी. डी. बापूंच्या सहकाऱ्यांनी डिसेंबर १९४५ मध्ये म्हापसा कचेरीवर हात बॉम्ब फेकला पण कचेरी उद्ध्वस्त झाली नाही. भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी. डी. बापूंनी गोवा मुक्ती लढ्यासाठी महाराष्ट्रात प्रचार दौरे करून, मदत गोळा करून गोव्याच्या आंदोलनासाठी पाठविली.
    ब्रिटिश साम्राज्य सत्तेने भारताला स्वातंत्र्य जाहीर केल्यानंतर १९४६ साली स्वातंत्र्याचा कौल घेण्यासाठी निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये सातारच्या प्रतिसत्तेतील सर्वांनी साथ केली. काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. त्यांनी सर्व भूमिगतांची वॉरंटस् रद्द केली.
    त्यानंतर कोरगाव येथे भूमिगत प्रगट होण्याचा कार्यक्रम ठरला. सातारा प्रतिसत्तेतील भूमिगतांनी फक्त क्रांतिसिंह नाना पाटील हेच हजर राहून सत्कार स्वीकारतील असे ठरविले. परंतु सातारा व दक्षिण संस्थानातील इतर भूमिगत हजर होते. त्या सर्वांच्या ओझ्याने सत्काराचे व्यासपीठ मोडून पडले. जी. डी. बापू व त्याच्या सहकाऱ्यांनी जनतेचे स्वातंत्र्य अजून येणार आहे. ते आणावे लागेल, त्यासाठी लढावे लागेल आणि त्या लढ्याचे स्वरूप हे प्रतिसत्तेप्रमाणे असू शकेल. म्हणून त्यांनी सत्कार स्वीकारले नाहीत. प्रसिद्धीपासून ते दूर राहिले.
    १५ ऑगस्ट, १९४७ला भारत स्वतंत्र झाला. भारतातील सर्व संस्थाने खालसा होऊन भारतात विलीन झाली. मात्र हैद्राबाद संस्थान भारतात विलीन होण्यास तयार नव्हते. मराठवाडा हैद्राबाद संस्थानचा भाग होता. जनतेवर होणारे रझाकारांचे अन्याय-अत्याचार थांबविण्यासाठी नांदेड येथे झालेल्या शिक्षण परिषदेमध्ये बापूंना नदतीची हाक दिली. जी. डी. बापू लाड आपल्या सहकाऱ्यांसह शस्त्रास्त्रे घेऊन मराठवाड्यात दाखल झाले. तेथे रझाकार विरोधी लढ्याचे जोमाने संघटन केले. सैनिकी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केले. रझाकार विरोधी लढ्यासाठी जागृती दौरा केला व हत्यारांची जमवाजमव केली. विझत आलेल्या लढ्याला नवसंजीवनी दिली.
    सैनिकी प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांच्या साहाय्याने रझाकारांच्या तळावर हल्ले केले. उद्धवराव पाटील यांनी रझाकारांच्या तुकडीवर शेंदरी स्टेशनजवळ हल्ला करून त्यांना पळवून लावले. पळून गेलेले रझाकार पिंपरीच्या पंडितराव पाटलांच्या वाड्यात आश्रयाला गेले. त्याठिकाणी हल्ला करून तेथून त्यांना हुसकावून लावले.