day, 00 month 0000 -
Responsive image
  आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा.       गटारी वाहत्या ठेऊन आपले कुटुंब आरोग्य संपन्न ठेवा.       विचार करा एकाचा, मार्ग कुटुंब कल्याणाचा.       वैयक्तीक शौचालयाचा वापर करावा.       पिण्याच्या पाण्याचा वापर योग्य करा.       नळ कनेक्शनला चावीचा वापर करावा.       प्लास्टिकचा वापर करू नये.



ग्रामपंचायत कुंडल ता. पलूस जि. सांगली


गावामधील उद्योग धंदे



क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखाना कुंडल

    स्वातंत्र्यसैनिकांचे नेते डॉ.जी.डी.बापू लाड यांनी अनेक अडचणींवर मात करून क्रांती सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात साखर कारखान्याची उभारणी करणे हे मोठे आव्हान होते. कारखान्याची पहिली तुकडी २००२-०३ मध्ये झाली. कारखाना यशस्वीपणे सुरू झाल्यानंतर उसाचे उत्पादन वाढवणे गरजेचे होते. बापूंच्या अखंड प्रयत्नाने व प्रस्थापितांबरोबरच्या संघर्षातून साखर उद्योगाने कुंडल व परिसराचा सर्वांगीण चेहरामोहरा ऐश्वर्य संपन्न केला. पण त्याचबरोबर सहकारी कारखानदारीडबघाईला आली असताना पारदर्शक व काटकसरीच्या कारभाराने सहकारातील एक मानदंड ठरला. तळातील शेवटच्या माणसांपर्यंत विकासाचा लाभ पोहोचविण्यासाठी तळमळीने धडपडणारा उद्योग म्हणून नावलौकिकही कमावला. शेतकऱ्यांनी कष्टाने घेतलेल्या ऊस उत्पादनाला जास्तीत जास्त दर दिला.

    कारखान्याच्या स्थापनेनंतर क्रशिंग क्षमतेत वाढ, सहवीज निर्मिती प्रकल्प, माती पाणी देठ-पान परीक्षण प्रयोगशाळा, आसावणी प्रकल्प, गांडूळ व सेंद्रीय खत निर्मिती, रोपवाटिका, शेतकऱ्यांना ठिबक सिंचन साठी प्रोत्साहन, शेतकन्यांच्या बांद्यापर्यंत जाऊन मार्गदर्शन आदी प्रकल्प यशस्वीपणे राबविले आहेत. उस विकास विभाग स्थापन करून शेतकऱ्यांचे एकरी ऊस उत्पादन दुपट्टीने वाढवून शेतकऱ्यांना किफायतशीर शेतीचा धडा घालून दिला आहे. क्रांती कारखान्याने आपल्या उत्कृष्ट कारभाराने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.




किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड किर्लोस्करवाडी

    स्वातंत्र्य पूर्व काळात कुंडल मध्ये १९१० ला स्थापन झालेली किर्लोस्कर हि पहिली औद्योगिक कंपनी. भारत हा देश कृषी प्रधान देश असल्याने उद्योग धंदे कमी होते, ज्यावेळी भारतात उद्योग उभारणी ला सुरवात झाली तेंव्हा उद्योग हे कृषी वर आधारित होते. शेती क्षेत्राची गरज ओळखून लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी नांगराचे फाळ निर्मिती पासून सुरवात केलेली हि कंपनी पुढे पाण्याचे इंजिन, पंप, मोटर ते आता इलेक्ट्रिक दुचाकी, ७० देशात आपले जाळे विणणाऱ्या कंपनीच्या थक्क करणाऱ्या प्रवासाची सुरुवात कुंडल येथून झाली या आधीच्या सर्व लोकांचं आर्थिक गणित हे शेतीवर आधारित होते, शेतमाल धान्य, फळे, भाजीपाला, दूध या व्यतिरिक्त इतर कोणतीही नगदी पिके घेतली जात नव्हती.

    गावच्या तरुणाईच्या हाताला काम आणि खिशात दाम असल्या शिवाय गावचा आणि एकूणच समाज व्यवस्थेचा विकास होणे शक्य नव्हते. कुंडल येथील उपलब्ध कामगार हा शेतात राबलेला, बैलांमागे चाललेला, अंगाने राकट, पण कुशाग्र बुद्धीचा बाहुबली होताच पण आता किर्लोस्कर मुळे मिळणाऱ्या पगारा मूळे तो पांढरपेशी झाला. धोतरातल्या पिढी नंतर ची विजार, शर्ट अन टोपी घातलेली अन आता सुटा- बुटातील पिढी असा बदल शेतीला औद्योगिकीकरणाची जोड मिळाल्याने झाला. दुचाकी चारचाकी गाड्या घेतल्या, आजू बाजूला हॉटेल, कपड्यांची दुकाने, सोन्या-चांदी ची दुकाने, थिएटर, दवाखाने, दळण वळणाची साधने म्हणून एस. टी., खाजगी जीप सारख्या गाड्या दिसू लागल्या. शिक्षणाची सोय झाली आर्थिक गरजा पुर्ण करणेसाठी सत्यविजय बँकेची निर्मिती, काही नि आपले आपले वर्कशॉप चालू केल्याने शेजारील पलूस या ठिकाणी स्वतंत्र एम. आई. डी. सी. सुरु झाली असा मोठा बदल किर्लोस्कर कंपनी मुळे कुंडल करांना अनुभवता आला.




क्रांती गारमेंट कुंडल

    बहुजन समाजातील गरीब, विधवा, पीडित महिलांना रोजगार मिळावा, त्यातून त्या स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने उभा रहाव्यात, हा बापूंचा ध्यास होता. त्यासाठी बापूंच्या प्रेरणेतून 'क्रांती गारमेंट' ची सुरुवात झाली. अल्प शेती असणाऱ्या शेतकरी कुटुंबाना शेतीतून येणाऱ्या उत्पन्नातून आपला संसार चालविणे अवघड जाते. त्यासाठी शेतकरी महिलांना दूध उत्पादनाचा जोड उद्योग करता यावा यासाठी 'क्रांती दूध संघ' सुरू करण्यात आला. या उद्योगांच्या माध्यमातून अनेक गरजू महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्या स्वाभिमानाने व निर्भयपणे आपला संसार चालवित आहेत.

    महिलांच्या सक्षमीकरणासाठी बापूंनी महिलांना विविध सामाजिक उपक्रमातून मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी सतत प्रोत्साहन दिले. अगदी प्रतिसरकारच्या चळवळीमध्ये देखील महिलांची संख्या मोठी होती. त्यावेळी भूमिगतांना जेवण, शस्त्रे, निरोप पोहचविण्याचे काम धाडसाने महिला करत. पर्यावरण, ग्रामस्वच्छता, तंटामुक्त गाव, निर्मलग्राम, दारूबंदी, व्यसनमुक्ती, गुणवत्तापूर्ण शिक्षण, वृक्षारोपण यासारख्या उपक्रमांतून महिलांना भागीदारी करण्यासाठी पाठबळ दिले.




क्रांती दूध संघ कुंडल

    ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या संकल्पनेतून कुंडल येथे क्रांती मिल्क प्रोसेसिंग को. ऑप. सोसा. लि., कुंडल या मल्टीस्टेट दूध संघाची स्थापना २००४ साली करण्यात आली. परिसरातील शेतकरी शेती पूरक व्यवसाय म्हणून पशूपालन करतात. त्यामुळे त्यांच्याकडे दूधाची उपलब्धता असल्याने त्या उपलब्ध दुधावर प्रक्रिया व दूध विक्रीसाठी या संघामध्ये प्रतिदिन ५०,००० लि. दुधाची आवक होते. त्यावर प्रक्रिया करून विविध उपपदार्थ बनवले जातात. हे पदार्थ क्रांती या ब्रँडखाली पुणे व मुंबईसारख्या शहरात पुरवले जातात. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपुरक व्यवसायाला चालना मिळून त्यांच्या उत्पन्नात भर पडत आहे.




राजतिलक कलर इंडस्ट्री कुंडल

    राजतिलक उद्योग हा रंग बनवण्याच्या पूर्वीच्या उद्योगांपैकी एक आहे. त्याची स्थापना नोव्हेंबर २००३ मध्ये श्री. सचिन लाड यांच्या कार्यक्षम नेतृत्वाखाली झाली. नाविन्यपूर्ण अनुभव आणि उद्योगाविषयी सखोल समज यामुळे, कंपनीने बाजारपेठेत स्वतःसाठी एक अद्वितीय भूमिका समाविष्ट केली. नैसर्गिक घटक आणि शून्य हानीकारक प्रभाव असलेल्या उत्कृष्ट उत्पादनांसाठी. कंपनीची स्थापना १६ वर्षांपूर्वी उत्तम दर्जाची रांगोळी, गुलाल पावडर आणि कुमकुम उत्पादन, निर्यात आणि पुरवठा करण्याच्या दृष्टीकोनातून करण्यात आली होती.

    भारतात, दिवाळी आणि दसरा प्रमाणेच होळी हा सर्वात उज्ज्वल सणांपैकी एक आहे. होळी उत्साही रंगांनी साजरी केली जाते - हे रंग आनंदाचे रंग आहेत, प्रेमाचे रंग आहेत आणि आपले जीवन आपल्या हृदयाच्या गाभ्यापर्यंत आनंदाने भरतात. ते प्रत्येक जीवनाला त्याच्या विविध रंगछटांनी सजवते. आजकाल, वाढती लोकसंख्या आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे लोक रेडीमेड सिंथेटिक रंगांना प्राधान्य देतात. असे रंग त्वचा, डोळे आणि वातावरणासाठी चांगले नाहीत. अशा हानीमुळे लोक होळीत रंग खेळण्याकडे पाठ फिरवत आहेत. म्हणून, आम्ही राजतिलक उद्योग कोणतेही हानिकारक रसायने आणि कृत्रिम रंग न वापरता अधिक नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक उत्पादने बनवत आहोत. आम्ही नैसर्गिक संसाधनांमधून काढलेल्या रंगांना प्राधान्य देतो.

    आमच्याकडे उत्पादन, पुरवठा, ब्रँडिंग, विक्री आणि विक्रीनंतरची कामे पद्धतशीरपणे पार पाडण्यासाठी व्यावसायिकांची तज्ञ टीम आहे. आमच्या टीममध्ये अत्यंत अनुभवी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये कामगार, गुणवत्ता नियंत्रक, संशोधन आणि विकास, गोदाम आणि पॅकेजिंग, लॉजिस्टिक, विपणन आणि विक्री संघ यांचा समावेश आहे. आमचे गुणवत्ता नियंत्रक आमच्या आदरणीय ग्राहकांना निर्दोष रंग देण्यासाठी होळी पावडरवर विविध कडक चाचण्या घेतात.




श्री अंबिका स्वीट कुंडल

    कंपनीचा प्रवास १९७५ सालापासून सांगली जिल्ह्यातील कुंडल येथून सुरू झाला .त्याची सुरुवात महादेव जौंजाळ आणि गजानन जौंजाळ या दोन्ही भावांनी केली होती .२०००० च्या भांडवलावर स्थानिक बँकांकडून कर्ज घेऊन त्यांनी कुंडल येथे “सत्यम शिवम सुंदरम्” या नावाने एक छोटेसे दुकान सुरू केले .अद्वितीय दर्जा आणि परवडणाऱ्या दरामुळे जवळपासच्या परिसरातील लोक दुकानाकडे आकर्षित झाले आणि चवीतील सातत्य आणि उच्च दर्जाच्या गुणवत्तेमुळे काही महिन्यांत मागणी वाढू लागली .सुरुवातीला त्यांनी [जलेबी , लाडू ] सारख्या पारंपारिक मिठाईपासून सुरुवात केली .१९७९ मध्ये त्यांनी त्याच गावात त्यांचे स्थान मोठ्या परिसरात हलवण्याचा निर्णय घेतला . अधिक कर्ज आणि अधिक भांडवलासह त्यांनी नवीन बांधकाम सुरू केले आणि १९८२ मध्ये संपूर्ण सेटअपसह त्यांनी नवीन तंत्रज्ञानासह सुरुवात केली .आणि स्वतःला 'श्री अंबिका स्वीट्स' या नवीन नावामध्ये विलीन केले. १९८२ मध्ये उत्पादन क्षेत्रात ५ कामगारांपेक्षा कमी कामगार काम करत होते त्यापैकी बरेच त्यांच्या कुटुंबातील होते.

    १९९० मध्ये विश्वजीत जौंजाळ या व्यवसायात रुजू झाले आणि १९९० नंतर कंपनीची वाढ झपाट्याने होऊ लागली. १९९५ मध्ये त्यांनी [ चिवडा , फरसाण , बाकरवडी ] इत्यादी खाद्यपदार्थ आणले . दशकाच्या शेवटी खाद्यपदार्थांची मागणी ३५% पेक्षा जास्त वाढली. २००१ च्या सुरुवातीला धनंजय जौंजाळ हे देखील या व्यवसायात सामील झाले. सन २००२ मध्ये त्यांनी दिवाळीचे रेडिमेड खाद्यपदार्थ आणले ज्यात लाडू , चिवडा , करंजी , शंकरपाळी , बाकरवडी आणि बरेच काही समाविष्ट आहे . आणि त्यामुळे त्यांच्या फर्मचे नाव त्या काळी जिल्ह्यात सर्वदूर प्रसिद्ध झाले होते. सर्व खाद्यपदार्थ चांगल्या चवीनुसार आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणारी त्यांची फर्म संपूर्ण जिल्ह्यात एकच होती.

    त्याच वर्षी ते रेडीमेड रुकवत [लग्नाच्या कार्यक्रमात दिले जाणारे गोडाचे बॉक्स] सादर करतात. २०१० च्या अखेरीस ते संपूर्ण जिल्ह्यात लोकप्रिय झाले होते. चव आणि उत्तम सेवेतील सातत्य यामुळे त्यांच्या वस्तूंची मागणी ६०% ने वाढली. २०२२ मध्ये त्यांना मिठाई आणि हॉटेल उद्योगात सातत्य राखल्याबद्दल "सकाळ मीडिया" द्वारे 'बिझनेस ऑफ महाराष्ट्र २०२२' या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले, .आता दिवसाला ५० कामगार उत्पादन क्षेत्रात काम करतात आणि ते २००० किलोपेक्षा जास्त खाद्यपदार्थ तयार करतात .आज जौंजाल कुटुंबाची चौथी पिढी दुकानात सातत्याने काम करत आहे .आगामी वर्षात ते पूर्णतः आपोआप आणि पूर्णपणे वाफेच्या यंत्राने त्यांचे उत्पादन क्षेत्र वाढवत आहेत . आता ६ हून अधिक जिल्ह्यांतील ग्राहक दरवर्षी दुकानाला भेट देतात. ते मुख्यतः घाऊक विक्रेत्यापेक्षा उत्पादनासाठी थेट ग्राहकांना प्राधान्य देतात.




मे. सुर्या सिमेंट पाईप इंडस्ट्रीज

    मे. सुर्या पाईप इंडस्ट्रीजची स्थापना २००० साली कुंडल येथील साठेनगर शेजारी श्रीरामनगर येथे झाली.सुर्या पाईप इंडस्ट्रीज मध्ये आर.सी.सी. पाईप, सेफ्टी टँक, वॉटर टँक, गव्हाण, गटर पाईप, V आणि U आकारच्या पाईप या ठिकाणी तयार केल्या जातात आणि पाठवल्या जातात. त्याचबरोबर सॉकेट पाईप NP2, NP3 क्लास च्या पाईप देखील तयार केल्या जातात.

    सिमेंट पाईप बनवण्यासाठी वायर, रॉड (स्टील), खडी, सिमेंट, केमिकल इत्यादी वस्तूंचा उपयोग करून सगळे प्रोडक्शन केले जाते. महत्वाचे म्हणजे उत्पादनाला ISO नामांकन प्राप्त आहे.



Copyright © कुंडल ग्रामपंचायत, कुंडल.
All Right Reserved.