शासनाच्या कोणत्याही विभागात सेवा बजावताना त्याआधी त्या विभागाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याने केवळ वन खात्यातीलच नव्हे तर प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे विद्या संकुल कुंडल (ता पलूस, जि. सांगली) येथे १७ फेब्रुवारी २०१४ साली सुरू झाले. महाराष्ट्रातील एकमेव असे कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने) ही संस्थातत्कालिन वनमंत्री स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांच्या संकल्पनेतून साकारली आणि कुंडल गावाचे नाव देशभर झाले. भारत सरकारच्या नियमावलीनुसार संबंधित लोकसेवा आयोगातून वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना सेवापूर्व प्रशिक्षण देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. यानुसार येथे प्रत्येक वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना अठरा महिन्यांचे अनुभवी आणि तज्ज्ञ लोकांकडून प्रशिक्षण दिले जाते. कुंडल-विटा रस्त्यालगत असणाऱ्या उजाड माळावर ३० एकर क्षेत्रात हे वानिकी प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्राचे पूर्ण संचलन डेहराडून (उत्तराखंड) येथून चालते.
    वानिकीच्या माध्यमातून वन संवर्धन, वन रक्षण आणि वन्यजीव रक्षणासाठी या प्रशिक्षण संस्थेत अविरत विद्यादानाचे धडे दिले जातात, यासाठी नवनवीन तंत्रज्ञान वापरून देशातील वनांचे संरक्षण कसे केले जाऊ शकते, वन्यजीवांना अभय देताना तसेच त्यांची संख्या वाढवून खाद्य साखळी पूर्ण करून श्रुष्टीचा समतोल साधण्याचे धडे दिले जातात, आणि या वन्य जीवांपासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी वन्यजीवांना त्यांच्या अधिवासात संवर्धन कसे करायचे याबाबत अद्यावत प्रशिक्षण या येऊ घातलेल्या अधिकाऱ्यांना कुशल आणि तज्ञ प्रशिक्षकांकडून दिले जाते. वन अकॅडमीच्या या आवारात प्रशिक्षणार्थींना कसलीही कमतरता भासू नये यासाठी उत्तम राहण्यासाठी सोय करणेत आली आहे, उत्कृष्ठ जेवण, व्यायामशाळा, विविध खेळ प्रकारांची ही सुविधा पुरवली जाते. आजवर या वानिकीमध्ये विविध राज्यातून ३३३ वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे, देशभरातील प्रशिक्षणार्थी कुंडल या ऐतिहासिक नगरीतील अनंत आठवणी उराशी बाळगून देशाच्या कानाकोपऱ्यात आपली सेवा बजावताना आपण कुंडलकर असल्याचा गर्व कोणाही कुंडल वासियाला वाटला नाही तर नवलच त्यामुळे या वन अकॅडमीमुळे कुंडलच्या सौंदर्यात भरच पडली आहे.