ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाची मुक्तता करण्यासाठी आणि गोरगरीब कष्टकऱ्यांच्या सुखासमाधानाचे स्वराज्य साकारण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ व नवे नेतृत्व तयार करणे आवश्यक होते. या हेतूने कुंडलला प्रतिसरकारचे लष्करी प्रशिक्षण केंद्र जी. डी. बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले.
    गावोगावचे तडफदार तरुण एकत्र करून जी. डी. बापूंच्या कठोर शिस्तीखाली त्यांना लष्करी प्रशिक्षण दिले जाऊ लागले. त्यातून तुफानसेना तयार झाली. त्या तुफान सेनेचे फिल्डमार्शल- सरसेनापती जी. डी. बापू लाड होते. या लष्करी प्रशिक्षण केंद्रात तरुणांना कुस्तीपासून पिस्तूल - रायफली चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात असे. बौद्धिकांचे आय़ोजनही केले जात असे. तुफान सेनेच्या माध्यमातून प्रतिसरकारचे अनेक विधायक उपक्रमही यशस्वीपणे राबविले गेले. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्याला लोकांचे पाठबळ मिळाले.
    कुंडलमधील एका वृद्धेच्या घरावर सावकाराने कर्जाच्या परतफेडीसाठी जप्ती आणली. वृद्धेच्या घरातील भांडीकुंडी, जनावरे, किडूक- मिडूक सगळ्या चीजवस्तू जप्त केल्या. त्याचवेळी जी. डी. बापू त्याबाजूने जात होते. त्यांना ती वृद्धा म्हणाली, “तुझे स्वराज्य केव्हा यायचे ते येऊ देत. पण आज माझी अब्रू वेशीवर टांगली जात आहे. त्याला मी काय करू ते सांग". बापूंना त्या वृद्धेवरील अन्याय सहन होणे शक्य नव्हते. त्यांनी जप्तीसाठी आलेल्या सावकाराला हटकले. कर्जाचा दस्त फाडण्यास सावकाराला भाग पाडले. त्याच्याकडून सर्व कर्ज फिटले आहे, म्हणून लिहून घेतले.
    सावकाराच्या अन्याय अत्याचाराला बळी पडणाऱ्या अशा अनेक कष्टकऱ्यांची, गोरगरिबांची, शेतकऱ्यांची सुटका जी. डी. बापू लाड यांच्या नेतृत्वाखालील तुफानसेनेने केली. सावकारी नष्ट करणे हा प्रतिसरकारचा महत्त्वाचा कार्यक्रम झाला..
    तुफानसेनेचे फिल्डमार्शल जी. डी. बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली खेड्यापाड्यातून जनता कोर्ट भरवली जात. गोरगरिबांच्या जमिनी बळकावणारे, माता-भगिनींवर अन्याय-अत्याचार करणारे, चोर-दरोडेखोर, क्रांतिकारकांची माहिती पोलिसांना देणारे खबरे, अशा समाजकंटकांची काळी यादी तयार केली जात असे. ठरलेल्या दिवशी व गावी अशा समाजकंटकांना व गावाच्या परिसरातील जनतेला गुप्तपणे निरोप पाठवून एकत्र केले जात असे.
    जी. डी. बापू तुफानसेनेसह तेथे हजर असत. वादी प्रतिवादी आपली बाजू जमलेल्या लोकांसमोर मांडत असत. जमलेल्या लोकांकडून निकाल घेतला जात असे. त्यावेळचे वातावरण व जमलेल्या जनसमुदायाच्या भावना पाहूनच वादी प्रतिवादी दिलेल्या न्यायाचा स्वीकार करीत असत. जनता कोर्टामुळे गुन्ह्यांची जाहीर चौकशी होऊन गुन्हेगारांना भरपाई देण्यास भाग पाडले जात असे. अस्तित्वात असलेल्या सरकारी यंत्रणेकडून त्याच्या नोंदी करून त्यास कायदेशीर रूप दिले जाई.
    प्रतिसरकारच्या माध्यमातून जी. डी. बापूंच्या तुफानसेनेने अनेक गरीब नाडलेल्या शेतकऱ्यांवरील अन्याय-अत्याचारांचे निवारण केले. दारू गाळण्याचे व विक्रीचे उद्योग बंद केले. ग्रामस्वच्छता, एक गाव एक पाणवठा, सावकारबंदी, गांधी विवाह पद्धतीचा प्रसार, शेतऱ्यांच्यापिकांचे जनावरांचे संरक्षण, आदी विधायक कार्यक्रम राबविले.
    इतकेच नव्हे तर स्त्रियांवर अन्याय-अत्याचार करणाऱ्यांना जबर शासन दिले. स्त्रियांना निर्भयपणे जगता येण्याइतपत गावगुंडामध्ये दहशत निर्माण केली. स्त्रियांना विश्वास दिला. त्यामुळे प्रतिसरकारच्या विधायक कार्यक्रमांत स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागल्याभूमिगतांना जेवण, निरोप देणे, शस्त्रे देणे, दारूगोळा पोहचविणे, आदी कार्यात स्त्रिया भयमुक्त होऊन क्रांतिकारकांना मदत करू लागल्या.