Responsive image
  आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा.       गटारी वाहत्या ठेऊन आपले कुटुंब आरोग्य संपन्न ठेवा.       विचार करा एकाचा, मार्ग कुटुंब कल्याणाचा.       वैयक्तीक शौचालयाचा वापर करावा.       पिण्याच्या पाण्याचा वापर योग्य करा.       नळ कनेक्शनला चावीचा वापर करावा.       प्लास्टिकचा वापर करू नये.



ग्रामपंचायत कुंडल ता. पलूस जि. सांगली


स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांबद्दल माहिती



१९४२ मधील अविस्मरणीय तासगाव व इस्लामपूर मोर्चा

    ८ ऑगस्ट १९४२ रोजी गांधीजींनी “आम्ही हिंदुस्थानला स्वतंत्र करू अथवा स्वातंत्र्य मिळविताना मरून जाऊ. आता आम्ही गुलामगिरीत राहू शकत नाही." हा संदेश दिला. तथापि, इंग्रजांनी आंदोलन दडपून टाकण्यासाठी प्रमुख नेत्यांना अचानक पकडून अज्ञात स्थळी बंदीवासात टाकले. त्यामुळे सर्वत्र निषेध मोर्चे निघाले. जी. डी. बापू त्यावेळी पुण्यातील आयुर्वेद कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. पुण्यातील निषेध मोर्चात बापूंनी सहभाग घेतला आणि शिक्षण सोडून स्वातंत्र्यचळवळीत भाग घेण्यासाठी आपले गाव गाठले.

    २ सप्टेंबर, १९४२ रोजी तासगाव व १० सप्टेंबर, १९४२ रोजी इस्लामपूर तालुका कचेरीवर काढण्यात आलेल्या मोर्चाचा प्रचार आणि संघटन करण्यात जी. डी. बापू लाड अग्रभागी राहिले. तासगाव व कराड येथील मोर्चे यशस्वी झाले परंतु, वडूज आणि इस्लामपूर येथील मोर्चावर ब्रिटिश पोलिसांनी निशस्त्र मोर्चेकऱ्यांवर गोळीबार केल्याने अनेकजण हुतात्मा झाले.




सातारची भूमिगत चळवळ

    कराड, तासगाव, इस्लामपूर, वडूज या तालुक्यांच्या गावी १९४२ मध्ये प्रचंड निषेध मोर्चे निघाले. कराड आणि तासगावचे मोर्चे यशस्वी झाले. पण वडूज आणि इस्लामपूरच्या मोर्चेवाल्यांवर ब्रिटिश पोलिसांनी अमानुषपणे गोळीबार केला. अनेक शहीद झाले व कित्येक जखमी झाले. सर्व देशभर इंग्रजांनी अत्याचाराने लोकांचा आवाज बंद केला. पण सातारच्या क्रांतिकारकांनी भूमिगत राहून क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांशी सशस्त्र लढा देण्याचा निर्धार केला.

हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधलें ।
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो ।।

    या निश्चयाने ब्रिटिश सरकार खिळखिळे करण्यासाठी सरकारी कचेऱ्यांवर, पोस्टांवर हल्ले करून लुटणे, सरकारी डाकबंगले व रेल्वेस्टेशन्स जाळणे, रेल्वे उलथवणे, तारा तोडणे या आणि अशासारख्या कार्यक्रमांची भूमिगत चळवळ जी. डी. बापू व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केली.




भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सुवर्ण पान 'प्रतिसरकार'

    स्वातंत्र्याचा लढा तीव्र करण्यासाठी जनतेचा पाठिंबा हवा होता. त्यासाठी जनतेच्या अडीअडचणी सोडविल्या पाहिजेत व त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे, अशी भूमिका क्रांतिकारकांनी घेतली. लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या भावनेतून सातारच्या प्रतिसरकारची चळवळ साकार होत गेली.

    त्यावेळच्या सातारा जिल्ह्यातील ५००-६०० खेड्यातून ग्रामसफाई, खादी प्रसार, साक्षरता प्रसार, दारूबंदी, जुगारबंदी, हुंडाबंदी, गांधी पद्धतीने अल्पखर्चात विवाह, अस्पृश्यता निवारण, ग्रंथालयांची स्थापना, एक गाव एक पाणवठा, आदी विधायक उपक्रम हाती घेतले. विधायक कार्यक्रमांमुळे जनतेने सातारच्या क्रांतिकारकांना मोठे पाठबळ दिले. सातारा प्रतिसरकारच्या तुफान सेनेचे सरसेनापती म्हणून जी. डी. बापू लाड यांचे कार्य अतुलनीय असेच म्हणावे लागेल.




सशस्त्र लढ्यासाठी पैशांची जुळवाजुळव

    जी. डी. बापूंनी गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील तरुणांचे संघटन केले. सर्व स्तरातून असंख्य तरुण स्वातंत्र्य चळवळीत सामील होत होते. शस्त्रास्त्रांची व त्यासाठी पैशांची गरज दिवसेंदिवस वाढत होती. जी. डी. बापू लाड व नागनाथअण्णा नायकवडी यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासमोर 'पे स्पेशल ट्रेन' लुटण्याची योजना मांडली. ब्रिटिश सरकारचा पैसा चळवळीसाठी लुटण्यास नाना पाटील यांनी सहमती दिली.

    ७ जून १९४३ रोजी अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने जी. डी. बापू लाड, नागनाथअण्णा नायकवडी व अन्य सहकाऱ्यांनी शेणोलीच्या खिंडीमध्ये पे स्पेशल ट्रेन लुटण्याचा रोमहर्षक धाडसी कार्यक्रम यशस्वी केला. या लुटीतून १९,७१६ रुपयांचा निधी स्वातंत्र्य चळवळीसाठी मिळाला. या पैशातून जी. डी. बापू व नागनाथअण्णा यांनी गोव्याहून शस्त्रे खरेदी करून आणली.