सशस्त्र लढ्यासाठी लागणाऱ्या पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी जी. डी. बापू व नागनाथअण्णा यांनी सुरुवातीला साक्री येथील सरकारी खजिना लुटण्याची योजना आखली. परंतु, त्या खजिन्यापेक्षा मोठा खजिना धुळ्याहून नंदूरबारला सर्व्हिस गाडीतून जाणार असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाल्याने ऐनवेळी कार्यक्रम बदलला..
    १४ एप्रिल, १९४४ रोजी चिमठाण्याजवळ बापू व अण्णांनी सरकारी खजिना घेऊन जाणाऱ्या सर्व्हिस गाडीच्या रस्त्यावर भांडणाचे नाटक करत दहा गाड्या अडविल्या परंतु, त्यामध्ये खजिना नव्हता. मात्र ११वी गाडी भांडणाचे नाटक करून थांबविण्याचा प्रयत्न केला. ती थांबेना त्यामुळे त्या गाडीत खजिना असल्याची खात्री झाली. ठरलेल्या योजनेप्रमाणे साडेपाच लाखाचा खजिना लुटला. पोलिसांनी पाठलाग केला. पोलिसांच्या गोळीबारात जी. डी. बापूंच्या पिंढरीला गोळी लागून खोल जखम झाली. अशा अवस्थेतही बापू व अण्णा पोलिसांशी प्रतिकार करत निसटले.
    सातारा जिल्ह्यातील दरोडेखोरांच्या अनेक टोळ्या त्या काळात होत्या. या दरोडेखोरांनी जनतेकडून खंडण्या वसूल करण्याचा सपाटा लावला होता. दिवसाढवळ्या निरपराधांचे खून पडत होते. बाया-बापड्यांच्या अब्रूवर घाला घातला जात होता. इतकेच नव्हे तर क्रांतिकारकांच्या नावावर 'महात्मा गांधी की जय', 'नाना पाटील की जय' अशा घोषणा , देत दरोडेखोरांनी दरोडे घालण्याचा सपाटा लावला होता. स्वातंत्र्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवलेल्या क्रांतिकारकांची बदनामी यातून दरोडेखोर जनतेमध्ये करत होते.
    अशा क्रिमिनल फरारी दरोडेखोरांच्या शौर्याचा उपयोग स्वातंत्र्य लढ्यासाठी करण्याची योजना भूमिगतांमध्ये पुढे आली. त्यानुसार जी. डी. बापू लाड यांनी पूर्वेकडील दरोडेखोरांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे जनतेला लुटणाऱ्या ह्या दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्याचा कार्यक्रम जी. डी. बापूंच्या तुफानसेनेने हाती घेऊन बंदोबस्त केला.
    सशस्त्र लढ्याच्या सुरुवातीच्या काळात क्रांतिकारकांच्याकडे भाला, बरची, गोफण, काठी अशी पारंपरिक हत्यारे होती. या हत्यारांचा इंग्रजांच्या आधुनिक शस्त्रांसमोर फारसा उपयोग होणारा नव्हता. इंग्रजांशी पूर्ण तयारीनिशी लढा देण्याचा निर्धार क्रांतिकारकांनी केला. सांगली क्रांतिकारकांच्या गटाकडे हत्यारे होती. त्यांच्याकडून ती मिळविण्याचा प्रयत्न बापू व अण्णा यांनी केला. परंतु, हत्यारे मिळाली नाहीत. म्हणून हत्यारांची जमवाजमव करण्याच्या अनेक योजना जी. डी. बापू व नागनाथअण्णा यांनी आखल्या व यशस्वी केल्या.
    कोल्हापूर संस्थानातील जमीनदार, सरदार, सरंजामदार यांच्याकडे असणाऱ्या बंदुका मिळविल्या वा पळवून आणल्या. सावळज औटपोस्ट व सागाव पोलीस स्टेशन लुटून बंदुका मिळविल्या. तसेच शेणोली पे स्पेशल ट्रेन व धुळे खजिना लुटीतून मिळालेल्या पैशातून पोर्तुगिजांच्या ताब्यात असणाऱ्या गोव्यातून शस्त्रे खरेदी केली.
    जी. डी. बापू लाड व नागनाथअण्णा नायकवडी यांनी सशस्त्र लढ्यासाठी लागणारी शस्त्रे उपलब्ध करण्यासाठी अनेक योजना आखून पूर्णत्वास नेल्या. त्यातीलच एक म्हणजे सागाव पोलीस स्टेशन लुटून तेथील बंदुका आणण्याची योजना बापू व अण्णांनी तयार केली.
    ७ योजनेप्रमाणे १ ऑक्टोबर, १९४३ रोजी जी. डी. बापू लाड, नागनाथअण्णा नायकवडी, ईश्वरा गुरव, शाम पाटील यांनी सागाव पोलीस स्टेशनमधून बंदुका लुटल्या. त्यावेळी त्यांनी हवेत गोळीबार केल्याने गोळीबाराच्या भीतीने पोलीस जाग्यावरच थांबून राहिले. मात्र गावापासून काही अंतरावर जाईपर्यंत पाठीमागून पोलिसांचा गोळीबार सुरू झाला. पोलिसांनी क्रांतिकारकांचा ४-५ मैल पाठलाग केला. मात्र सर्वजण बंदुका घेऊन कुंडलला सुखरूप पोहचले. अशा अनेक धाडसी योजना आखून सशस्त्र लढ्यासाठी बापू, अण्णा व त्यांच्या सहकाऱ्यांनी शस्त्रांची जुळवाजुळव केली.