फिल्डमार्शल जी. डी. बापू लाड यांच्या नेतृत्वाखालील तुफानसेनेने गावोगावचे गुंड, ब्रिटिश पोलिसांचे खबरे, जुलमी वतनदार व सरंजामदार, दरोडेखोर, सावकार यांचा बंदोबस्त करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे जनसामान्यांना प्रतिसरकारच्या तुफानसेनेचा ब्रिटिश जुलमी राजवटीमध्ये आधार वाटू लागला.
    तुफानसेनेने दरोडेखोरांना, जुलमी सावकारांना, स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना, गावोगावच्या गुंडांना व पोलीस खबऱ्यांना पत्र्या लावल्या. पत्री मारणे म्हणजे गुन्हेगाराचे दोन्ही पाय घोट्याजवळ बांधून त्याच्या तळव्यावर जोरात काठीने फटके देणे होय. या पत्रीच्या शिक्षेमुळे ब्रिटिशधार्जिण्या लोकांच्या मनात तुफानसेनेने दरारा निर्माण केला. सातारा जिल्ह्यातील ५००-६०० खेड्यातील गुंडांनी, पोलिसांच्या खबऱ्यांनी तुफानसेनेच्या पत्रीचा मोठा धसका घेतला. दरोडेखोर, गुंड, सावकार, आदींच्या भीतीपासून सामान्य जनता मुक्त झाली.
    जी. डी. बापूंना सशस्त्र लढ्यातील सहभागासाठी इंग्रज सरकारने गोळीचा हुकूम दिला होता. त्यांना शोधून देण्यासाठी इनाम जाहीर केले होते. अशा परिस्थितीत जी. डी. बापू व विजयाताई यांचा विवाह २५ मे १९४४ रोजी रात्री ११.४५ वाजता संपन्न झाला. वधुवरांनी एकमेकांना स्वतःच्या रक्ताचे टिळे लावले. १० हजार लोकांच्या साक्षीने वामनराव चोरघडे, ग. दि. माडगूळकर, आदींनी नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या. विवाहास हजारो तुफान सैनिक हजर होते. बापूंना पकडण्यासाठी पोलीस टपून बसले होते. मात्र लग्नासाठी जमलेले सशस्त्र तुफानसैनिक पाहून पोलीस फक्त पहातच राहिले.
    या लग्नातून इंग्रजी सत्तेला शह देणारी प्रतिसत्ता स्थापन झाल्याचा संदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत गेला. लोक आणखी निर्भय होऊन स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होऊ लागले. लोकांच्या मनात प्रतिसरकारबद्दल आत्मविश्वास वाढला. लोक प्रतिसरकारला पाठबळ देऊ लागले.
    खानदेशचे क्रांतिकारक डॉ. उत्तमराव पाटील यांच्या पत्नी कॅप्टन लिलाताई पाटील यांना अमळनेरच्या संग्रामात अटक होऊन तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्यांनी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तेथून त्यांची सुटका करण्याची धाडसी योजना बापूंनी आखली.
    योजनेप्रमाणे ससून हॉस्पिटलमध्ये आजारीपणाचे नाटक करणाऱ्या लिलाताई पाटील यांना मोकळ्या हवेत फिरण्यासाठी घेऊन आलेल्या पोलिसांना बापू व मिरगे यांनी जमिनीवर पाडले आणि कळके यांनी लिलाताई पाटील यांना सायकलवर डबलसीट घेऊन चपळाईने रस्ता पार केला. बापू व मिरगे यांना पकडण्यासाठी लोक 'धरा - पकडा' म्हणून मागे लागले. पण त्या दोघांनीही लोकांच्या गर्दीत मिसळून 'धरा- पकडा' असे ओरडत चकवा देऊन निसटले. ठरल्याप्रमाणे नुकतेच लग्न झालेल्या विजयाताई लाड व लिलाताई पाटील रेल्वेने किर्लोस्करवाडीस पोहोचल्या. इथून पुढे विजयाताई पाटील यांनीही बापूंना क्रांतिकार्यात मोलाची साथ दिली व त्यांनाही क्रांतिवीरांगना म्हटले जाऊ लागले.
    सातारा प्रतिसरकारच्या तुफान सेनेचे फिल्डमार्शल जी. डी. बापू यांनी ऑगस्ट १९४५ मध्ये रेठरे बुद्रुक येथे तुफान दलाचे संचलन आयोजित केले होते. या संचलनासाठी क्रांतिसिंह नाना पाटील तसेच संचलन पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. नाना पाटील यांनी रात्री ९ वाजता संचलनाचे निरीक्षण केले व मानवंदना स्वीकारली. संचलनाच्यावेळी तुफानदलातील सैनिकांची कठोर परीक्षा घेण्यात आली. नाना पाटील, जी. डी. बापू यांची तुफानसैनिकांना स्फूर्ती देणारी आवेशपूर्ण भाषणे झाली.
    तुफान दलामध्ये भरती झालेल्या युवकाच्या हातावर काठीने जोरदार फटका मारला जाई. जो तो सहन करी तो तुफानसैनिक गणला जाई. व जो विव्हळत असे, त्याला विजयाताईंनी बांगड्या दिल्या. त्यामुळे उरलेल्या सर्व तुफानसैनिकांच्या मनामध्ये मर्दुमकी गाजविण्याची जिद्द निर्माण झाली.