कुंडलच्या कुस्ती मैदानाचा इतिहास वैशिष्ट्यपूर्ण असाच आहे. १९५७ सालच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीची प्रेरणा घेऊन महाराष्ट्र कुस्ती मैदान असे नाव देण्यात आले गणेशोत्सवानिमित्त अनंत चतुर्दशी नंतर येणाऱ्या रविवारी लोकवर्गणीतून कुस्ती मैदान भरविण्याची परंपरा आहे. गावात राजकीय संघर्ष असला तरी कुस्ती मैदान म्हटले की सर्वजण मतभेद विसरून मैदान यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याने कुंडलच्या एकोप्यालाही दाद द्यावीच लागेल.
    कुंडल गावाच्या पश्चिमेस पार्श्वनाथ व वीरभद्र डोंगराच्या पायथ्यास निसर्गाची दैवी देणगी लाभलेल्या जागेत भरणाऱ्या या कुस्ती मैदानासाठी लाखो कुस्ती शौकिनासह ठिकठिकाणच्या नामवंत मल्लांची उपस्थिती असते या मैदानाची निसर्गतः रचनाच अशी आहे की प्रेक्षक कुठेही बसले तरी कुस्त्या दिसणारच. देशातील सर्व राज्यातील मल्ल कुंडलच्या कुस्ती मैदानावर नजर ठेवून असतात.
    स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र म्हणून कुंडल गाव परिचित आहे. या गावाला पौराणिक ऐतिहासिक धार्मिक स्थळांचा वारसा आहे नाविन्याचा शोध जुनी परंपरा जतन करण्याची परंपरा या गावाने आजतागायत जपली आहे मैदानाच्या यशात कुस्तीची परंपरा जोपासण्यासाठी कुंडलवासीय आणि सतत घेतलेल्या अविरत कष्टाचे योगदानही महत्त्वपूर्ण आहे.
    सुरुवातीच्या काळात गावातील चावडी समोरील तालमीत कुस्त्या होत त्यानंतर परिसरातील पैलवान व शौकिनांची गर्दी वाढू लागल्यानंतर काही काळ गुरवकीच्या माळावर व कुंभार मळ्याच्या पायथ्याशी ही मैदान होत सन १९५७ पासून सध्याच्या महाराष्ट्र मैदानात कुस्त्या होत आहेत गेल्या अनेक वर्षापासून लाखाहून अधिक शौकिनांची उपस्थिती असते तसेच येथे जिंकणाऱ्या मल्लांना मोठी बिदागी दिली जाते.
    आज पर्यंत मैदानाच्या प्रायोजकासाठीही अनेक कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच क्रांती अग्रणी डॉ. जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना, श्री. महेंद्र (आप्पा) लाड मित्र मंडळ मामासाहेब पवार सत्यविजय सहकारी बँक लि कुंडल, ,माजी मंत्री स्व.डॉ.पतंगराव कदम साहेब यांनीही मैदानास मदत केली आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे प्रतिवर्षी या मैदानासाठी देशभरातील प्रसिद्ध आखाडे व तालमींना निमंत्रण पाठवले जाते आतापर्यंत या मैदानावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामवंत मल्ल खेळले आहेत या मैदानात अनेक नामवंत महिलांच्या लढती संस्मरणीय म्हणून नोंदवल्या आहेत मैदानातील निकाल निपक्षपाती देण्यासाठी उत्सव समितीने सतत काळजी घेतली आहे अनेक वेळा वादग्रस्त निकाल प्रेक्षकांच्या निर्णयावरूनच घेतले आहेत. देशात खुल्या मैदानात महिलांच्या मॅटवरील व गुणावरील कुस्त्यांची प्रात्यक्षिके घेऊन मैदानाने विविधता आणली आहे.
    महाराष्ट्र मैदानात जो जिंकला तो जिंकलाच असेच समीकरण आहे मैदान जो मल्ल गाजवेल तो देशात मान सन्मान मिळवतोच हा इतिहास आहे त्याचमुळे देशभरातील नामवंत मल्ल कुंडलचे मैदान गाजवण्यासाठी आतुर नामवंत मल्ल व महाराष्ट्र मैदान हे समीकरणच झाले आहे. कदाचित कुस्ती मैदाने देशात याहीपेक्षा मोठी होत असतील पण लोकवर्गणीतून होणारे कुंडलचे महाराष्ट्र मैदान हे देशभरातील सर्वात मोठे मैदान आहे.