महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने माझी वसुंधरा (माय अर्थ) हा पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
    विभागाकडून हाती घेतलेला हा भारतातील पहिला एकात्मिक उपक्रम आहे जो निसर्गाच्या पंचमहाभूतातील पाचही घटकांवर लक्ष केंद्रित करतो. त्यात भूमी (जमीन), जल (पाणी), वायू (हवा), अग्नी (ऊर्जा), आकाश (संवर्धन) यांचा समावेश असून त्यातून राज्याच्या शाश्वत विकासाप्रति प्रयत्न केले जातील.
    या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना वातावरणीय बदल आणि पर्यावरणीय समस्यांच्या परिणामांची जाणीव करून देणे आणि पर्यावरण सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. महाराष्ट्राचा शाश्वत विकास सुनिश्चित करणे आणि राज्यस्तरावर ठोस वातावरणीय कृती करणे हे देखील त्याचे उद्दिष्ट आहे. या अभियानातून राज्याला वातावरणीय बदलाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विविध उपाययोजना हाती घेण्यातही मदत होईल.
    माझी वसुंधरा अभियान या उपक्रमामध्ये सहा उपक्रमांद्वारे निसर्गाच्या पाच घटकांना पुनर्स्थापित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि वयोगटातील भागधारकांना सामावून घेऊन त्यांना शाश्वत विकास आणि वातावरणीय बदल यांविषयी जागृत करणे, हे महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या या उपक्रमाचे लक्ष्य आहे.
    माझी वसुंधरा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने संभाव्य कृती बिंदू ओळखण्यावर लक्ष केंद्रित करते. यामध्ये प्रत्येक नागरिकाला वैयक्तिक पातळीवर जोडण्याचे उद्दीष्ट आहे. सरकारी संस्था (माझी वसुंधरा शिखर परिषद), स्थानिक आणि जागतिक कॉर्पोरेट्स (माझी वसुंधरा कॉर्पोरेट्स) आणि सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ना नफा संस्थांना (माझी वसुंधरा नॉन प्रॉफिट) एका छताखाली आणून परिवर्तनाचे नेतृत्व करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. एवढेच नव्हे तर माझी वसुंधरा अभियानाने भावी पिढ्यांमध्ये हरित मूल्ये रुजविण्यासाठी पुढाकार घेतला आहे आणि महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासक्रम विकसित करण्याची योजना आखली आहे. (माझी वसुंधरा अभ्यासक्रम) शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागामार्फत पुढील शैक्षणिक वर्षात हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.