Responsive image
  आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा.       गटारी वाहत्या ठेऊन आपले कुटुंब आरोग्य संपन्न ठेवा.       विचार करा एकाचा, मार्ग कुटुंब कल्याणाचा.       वैयक्तीक शौचालयाचा वापर करावा.       पिण्याच्या पाण्याचा वापर योग्य करा.       नळ कनेक्शनला चावीचा वापर करावा.       प्लास्टिकचा वापर करू नये.



ग्रामपंचायत कुंडल ता. पलूस जि. सांगली


उत्सव


Responsive image

कुंडल यात्रे निम्मित भरणारे महाराष्ट्र कुस्ती मैदान

    कुंडल चे कुस्ती मैदान म्हणजे कुस्ती शौकिनांसाठी एक पर्वणीच असते, आणि संपूर्ण लोक वर्गणीतून भरले जाणारे हे सर्वात मोठे सार्वजनिक कुस्ती मैदान आहे, हे मैदान सण 1922 साली केशव नाना थोरबोले, ज्ञानू बाळा आवटे, सखाराम कृष्णा पवार, सखाराम आबाजी पवार, बापूराव विभूते, यांनी सार्वजनिक गणेश उत्सव कमिटीची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात ग्रामपंचायत समोरील पटांगणावर कुस्त्या भरविल्या जात होत्या काळानुसार जसे कुस्ती शौकिनांचा ओढा वाढू लागला आणि हे ठिकाण कमी पडू लागले, सन 1956 साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली याच दरम्यान जे आत्ताचे कुस्ती मैदान आहे तेथे याच काळात मैदान भरण्यास सुरुवात करणेत आली म्हणूनच याला महाराष्ट्र मैदान असा नामोल्लेख करण्यात येतो.

    देशभरातून अनेक मल्ल या मैदानाला भेट देत असतात, कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली येथून मल्ल आवर्जून कुस्ती खेळण्यासाठी आणि पाहण्यासाठी येथे येत असतात. आजवर विष्णू नगराळे, राष्ट्रकुल पदक विजेते काका पवार, शामराव मुळीक, मारुती पैलवान बोरगावकर, हिंदकेसरी मारुती माने, पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारी, हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, विष्णुपंत सावर्डे, हिंदकेसरी गणपतराव आंधळकर, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर, आप्पा कदम, रघुनाथ पवार, संभाजी पवार यांसारख्या अनेक नामवंत मल्लानी या मैदानावर भरभरून प्रेम केले आणि नेहमी मैदानाला भेटी दिल्या आणि येथे खेळासाठी येणाऱ्या मल्लांना स्फूर्ती देण्याचे काम केले.

    त्याच बरोबर येथे अनेक कुस्त्या गाजल्या त्यातील काही कुस्त्या अशा कि, 1992 साली संजय आटकेकर विरुद्ध उदयराज यादव यामध्ये संजय आटकेकर यांनी बाजी मारली होती आणि प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले होते. तसेच 1996 साली कर्नाटक केसरी रतनकुमार पटपती विरुद्ध दिल्लीचा मल्ल काळूराम यांची महाराष्ट्रातील पहिली रु 1 लाख रकमची कुस्ती याच मैदानावर भरली, तसेच 1986 साली अग्नेल निगरु आणि काका दह्यारी यांची कुस्ती हि गाजली होती, आप्पालाल शेख विरुद्ध अशोक शिर्के, इस्माईल शेख विरुद्ध काका दह्यारी, रावसाहेब मगर विरुद्ध विष्णू फडतरे, जगदीश कालीरामन विरुद्ध काळूराम, राष्ट्रकुल पदक विजेती कौशल्या वाघ महिला कुस्ती पट्टू, महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, विजय चौधरी, राष्टकुल पदक विजेता राहुल आवारे, मोहन माळी,संभाजी पाटील, रामचंद्र रिटनकर, अस्लम काजी, मधू मोरे, बाळू मुल्ला, राहुल आवारे, माउली जमदाडे, संदीप रासकर, आबा सुळ, समाधान घोडके, तसेच उत्तर भारतातील सोनू पैलवान, सर्वर पंजाब, समशेर, सुरेंद्र नाड,सुजित मान, दिलीपसिंग गाडीवाले, रोहित पटेल, साबा कोहली, परवेश, जोगेंदर, किरण भगत, चंद्रहार पाटील आदी नामवंत मल्लांच्या कुस्त्या हि येथील आकर्षण ठरल्या आहेत. या सर्व कुस्त्यांनी त्या त्या वेळी मैदान गाजवून कुस्ती शौकिनांना तोंडात बोटे घालायला भाग पाडले आहे.

    या मैदानाची अनेक वैशिष्ठ्ये आहेत या मुळेच हे मैदान देशभर प्रसिद्ध आहे, येथे निपक्ष निकाल दिला जातो, नुरा कुस्ती ला येथे कधीच थारा दिला नाही, आणि ज्यांनी तसा प्रयत्न केला त्यांना विना मानधन मायदेशी परत घालवण्यात आले आहे. हे मैदान संपूर्ण लोकवर्गणीतून भरविले जाते, अगदी सामन्यातील सामान्य माणूस हि त्याच्या कुवतीनुसार देणगी देत असतो, या मैदानाला नैसर्गिक देणगी लाभली आहे त्यामुळे येथे साधारण अडीच लाख प्रेक्षकवर्ग सहज कुस्त्यांच्या अनुभव घेऊ शकतो, आमदार फंडातून स्वर्गीय पतंगराव कदम यांनी वेळोवेळी या मैदानाची डागडुजी करण्यात आली आहे, या मैदानावर 1998 साली पहिल्या सार्वजनिक ठिकाणी महिला कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते आणि हा मान महाराष्ट्रात फक्त कुंडल च्या महाराष्ट्र मैदानालाच आहे. या मैदानाला अनेक वर्षाची परंपरा आहे, अनंतचतुर्दशी नंतर येणाऱ्या रविवारी हे मैदान भरते, सकाळी लोकवर्गनातून जमलेल्या पैशाची पेटी वाजत मैदानावर नेली जाते, नंतर मान्यवरांच्या हस्ते मैदानाचे पूजन होते, प्रथम लहान गटापासून कुस्त्या सुरु होतात आणि वजनी गटानुसार आणि बक्षीस रकमे नुसार कुस्त्या लावल्या जातात.

    आजवर नर्मदा सिमेंट, बिर्ला सिमेंट, किर्लोस्कर ब्रदर्स, महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी, स्वराज ट्रॅक्टर, क्रांतिअग्रनी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, मामासाहेब पवार सत्यविजय सहकारी बँक, महेंद्र लाड मित्र मंडळ, मार्वलस इंडस्ट्री,कोल्हापूर, या सारख्या सर्व आयोजकांमार्फत एक लाखांवरच्या कुस्त्या भरवल्या जातात. या कुस्ती मैदानासाठी कॅप्टन रामचंद्र श्रीपती लाड यांचे समालोचन गेल्या 60 वर्षांपासून प्रेक्षकांच्या कानात गाजत आहे तसेच कुस्ती तज्ञ बापूसाहेब राडे, शंकरराव पुजारी, महादेव लाड, ईश्वरा पाटील हि समालोचन वौशिठ्य पूर्ण असते, शामराव यशवंत लाड, आकाराम ज्ञानदेव पवार, हि मंडळी गेली 50 वर्षांपासून झटत आहेत, यातील काही मंडळी काळाच्या पडद्या आड गेली परंतु त्यांचा आवाज आजही प्रेक्षकांच्या कानात आहे, स्वर्गीय क्रांतिअग्रनी डॉ.जी.डी. बापू लाड आणि स्वर्गीय मामासाहेब पवार हे या मैदानाचे नेहमीच प्रेरणास्थान राहिले आहेत.

    या कुस्ती मैदानाची दखल राष्ट्रीय तसेच इंग्रजी दैनिकांतून जसेकी इंडियन एक्स्प्रेस, महाराष्ट्र टाइम्स, द हिंदू यामध्ये हि लेख प्रसिद्ध झाले आहेत तसेच जेष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांनी ही याबाबत बरेच लिखाण केले आहे. सन 1989 पासून या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची आणि कुस्ती मैदानाची सर्वस्वी धुरा या मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब लाड आणि त्यांचे सहकारी सक्षमपणे सांभाळत आहेत.


Responsive image


Responsive image