Responsive image
  आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा.       गटारी वाहत्या ठेऊन आपले कुटुंब आरोग्य संपन्न ठेवा.       विचार करा एकाचा, मार्ग कुटुंब कल्याणाचा.       वैयक्तीक शौचालयाचा वापर करावा.       पिण्याच्या पाण्याचा वापर योग्य करा.       नळ कनेक्शनला चावीचा वापर करावा.       प्लास्टिकचा वापर करू नये.



ग्रामपंचायत कुंडल ता. पलूस जि. सांगली


गावामध्ये राबवले गेलेले प्रकल्प आणि उपक्रम


Responsive image

प्लास्टिक कचऱ्यापासून धनप्राप्ती

    प्लॅस्टिक कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर उपाय शोधताना कुंडल (ता. पलूस) ग्रामपंचायतीने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ग्रामपंचायत थेट ग्रामस्थांकडून दहा रुपये किलो दराने प्लॅस्टिक कचरा विकत घेणार आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करून उपपदार्थ निर्मिती करीत गावास प्लॅस्टिक कचऱ्यापासून मुक्त करण्याचा संकल्प आहे.

    कुंडलला क्रांतीचा मोठा वारसा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात येथील क्रांतिकारकांनी मोठे योगदान दिले. स्वातंत्र्यानंतरही लोकहिताच्या चळवळी गाव अशी कुंडलची ओळख राहिली आहे. गावची ओळख देशपातळीवर उमटली ती हगणदारीमुक्त गाव मोहिमेमुळे जलस्वराज्य योजनेतून पिण्याच्या पाण्याबाबत गाव स्वयंपूर्ण झाले. त्यानंतर आणखी एक क्रांतिकारक निर्णय येथील कारभाऱ्यांनी घेतला. गावातील सांडपाणी एकत्र करून त्यावर प्रक्रिया करून शेतीला पुरवण्याची योजना उभारली. याद्वारे आज परिसरातील शेती बहरली आहे.

    देशात प्लॅस्टिक कचऱ्याच्या समस्येवर उपाय शोधण्याचे प्रयत्न होत असताना कुंडल ग्रामपंचायतीने एक नावीन्यपूर्ण योजना आणली आहे. गावातील प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला आहे. यासाठी आवश्यक प्लॅस्टिक कचरा ग्रामस्थांकडून प्रतिकिलो दहा रुपये दराने विकत घेतला जाणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी कुठेही जाण्याची गरज नाही. ग्रामपंचायतीचा एक ट्रॅक्टर नियमितपणे गावात फिरून हा कचरा गोळा करेल. सोबतचे कर्मचारी कचऱ्याचे वजन करून जागेवरच रोख पैसे ग्रामस्थांना देतील. सध्या याची माहिती देणारे फलक गावातील मुख्य चौकात झळकले आहेत. संकलन केलेल्या प्लॅस्टिकवर प्रक्रिया करून यापासून उपपदार्थ तयार करून गावाला तसेच देशाला प्लॅस्टिकमुक्त करण्याचा प्रयत्न संकल्प ग्रामपंचायतीने केला आहे.