कुंडल येथे पश्चिम महाराष्ट्रातील, महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाचा एकमेव सांडपाणी व्यवस्थापनाचा पथदर्शक प्रकल्प आहे यातून सर्व जिल्ह्याला सांड पाण्याचा पूर्णवापर करण्याबाबत प्रोत्साहन दिले आहे.
    कुंडल (ता. पलूस) हे गांव सध्या जल क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत आहे, गावामधील जे सांडपाणी वाहून जात होते ते पूर्वी ओढ्याला मिळत होते त्याचा पुर्णवापर करुन ते पाणी पुन्हा शेती योग्य करण्याचा खुणगाठ गावाने बांधली आहे. यामूळे गाव जलसाक्षरतेकडे वाटचाल करत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
    ज्याकाळी परिसरात दुष्काळ होता, त्याकाळी कुंडल येथे क्रांतिअग्रणी डॉ.जी. डी. बापू लाड यांचे सह सहकाऱ्यांनी पहिली जलक्रांती आणून हरितक्रांती साधली. त्यामूळे हे गांव पलूस तालुक्यात पुर्वीपासून सधन समजले जाते. साधारण २० हजार लोकवस्तीच्या गावाला पिण्याच्या पाण्याची एक प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आहे याव्दारे जवळपास १५ छोट्या- मोठ्या गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. प्रथम गावाने संपुर्ण गांव हागंदारी मुक्त करुन केंद्र शासनाकडून जलस्वराज्य योजने अंतर्गत स्वतंत्र अशी "जलस्वराज्य" पेय जल योजना मंजूर केली. ती काही कालावधीतच कार्यन्वित करण्यात आली आहे. याव्दारे शुध्द पाणी नागरिकांना पिण्यास पुरविले जाते. अशा वैविध्यपुर्ण गोष्टींचा गावाने नेहमीच पाठपुरावा केला आहे.
    यातूनच सन २०१४ साली महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या नाबार्ड मार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेने सांडपाणी व्यवस्थापन योजनेखाली महाराष्ट्रातून प्रायोगित तत्वावर प्रस्ताव मागविणेत आले होते. या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक प्रस्ताव आले होते पैकी त्यांनी दिलेल्या प्रस्तावांची छाननी प्राधिकरणाने दिलेले नियम व अटिंना पात्र ठरणा-या २८ प्रकल्पांना मंजूरी शासनामार्फत देणेत आली होती. त्याअर्थी हा प्रकल्प फक्त जिल्ह्यातीलच नव्हे तर पुर्ण पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव पुर्ण झालेला प्रकल्प म्हणता येईल. यासाठी शासनामार्फत ३ कोटी रुपयांचा निधी दिला आणि २८ गुंठ्यात हा प्रकल्प उभा आहे.
    हा प्रकल्प बस स्टँड जवळ उभा करण्यात आल्याने, नैसर्गिकरित्या गावापासून उताराच्या दिशेने असल्याने बहुतांशी भाग सोपा होत गेला. यामध्ये गावातील सर्व भागातील सांडपाणी वाहून नेणेसाठी आर.सी.सी. गटारींव्दारे सोय केली आहे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी २८९२ मीटर नवीन आरसीसी गटारी बांधण्यात आल्या आहेत तर २७ मीटर जुन्या गटारी दुरुस्ती केल्या आहेत. यातून या प्रकल्पासाठी साधारण ४ लाख लिटर सांडपाणी मिळते आहे. परंतू या प्रकल्पाची क्षमता भविष्यात १० लाख लिटर पर्यंत वाढविण्याचे दृष्टीने बांधकाम करणेत आले आहे. प्रथम या सांडपाण्यातून येणारा कचरा बाजूला करणेसाठी स्क्रीन चेंबर बसविण्यात आला आहे, यामध्ये सर्व अनावश्यक भाग (घनकचरा) बाजूला करुन फक्त पाणी पुढे पंप हाऊस व्दारे जाते, हे पाणी पुढे ३३३ चौ.मीटरच्या बायोरियॅक्टर १ या टाकीमध्ये जाते, तेथे आवश्यक ती प्रक्रिया हाऊन त्यानंतर तेथे हे पाणी बायोरियॅक्टर २ या ६६९ चौ.मीटरच्या टाकीत जाते यामध्ये पाणी शास्त्रीय पध्दतीने (स्वाईल बायो टक्नॉलॉजी) शुध्द केले जाते. हे पाणी पुढे साठवन टाकीत जाऊन तेथून जवळपास ९० टक्के पाणी शेतीसाठी उपलब्ध होते. यातून जे पाणी शेतीयोग्य तयार होते त्यासाठी जवळपास ७ अश्वशक्तीच्या मोटारींने ३० एकर क्षेत्र ठिबक सिंचनाव्दारे ओलीताखाली येत आहे. हे पाणी अल्पदरात शेतक-यांना पुरविले जाते. यातून गावाने एक जल साक्षरतेचा आदर्श जिल्हालाच नव्हे तर राज्यासाठी घालून दिला आहे.